आपला निसर्ग

सह्याद्रीच्या डोंगररांगा व पठारावरील फुले

पश्चिम घाटातील सह्याद्रीचा परिसर किल्ले, तीर्थक्षेत्र, नद्यांचे उगम,गिरीस्थाने,अभयारण्ये व जैवविविधता या साठी जगभर प्रसिद्ध आहे.सह्याद्रीच्या या परिसराने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपला आहे. याच सह्याद्रीच्या पर्वतरांगा व पठारावर वर्षभर विविध फुले, पक्षी,प्राणी,फुलपाखरे,कीटक,सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. श्रावण भाद्रपदात तर यांची जत्राच भरते.याच काळात आपण सर्व निसर्ग प्रेमी ट्रेक, ट्रेल्स, श्रावणी सोमवार, वर्षाविहार, खास फुले पाहायला मित्र किंवा परिवारासमवेत जात असतो. या निसर्गातील रंगीबिरंगी सोहळ्यातील काही फुलांची माहिती 

सोनकी 

श्रावणामध्ये आपल्या शेतीमध्ये कारळ्याची पिवळीजर्द फुले फुललेली असतात याच वेळी निसर्गामध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा व पठारावर सोनकीची फुले  फुललेली असतात . सोनकीचे मुळ नाव सोनिशिओ बोम्बेयेन्सीस किंवा सोनिशिओ ग्रहमी,ब्रिटीश धर्मगुरू जॉन ग्रहमी यांनी अनेक वनस्पतींचा अभ्यास केला त्यांच्या स्मरणार्थ हे नाव आहे.

नागफणी किंवा सापकांदा


पावसाळ्यात जमिनीमध्ये पाणी शिरले की आम्हा सर्प मित्रांचे फोन वाजायला लागतात जमिनीतून साप बाहेर पडून घरामध्ये किंवा गोठ्या मध्ये शिरतात . जुलै,ऑगस्ट मध्ये अळूच्या कुटुंबातील नागफणी ही वनस्पती आधी फुल मग पाने उलट्या क्रमाने दाट जंगलात, अडचणीच्या ठिकाणी उगवतात. जमिनीतून एकच काडी बाहेर येऊन कनसासारखा भागातून नागाच्या फडीसारखा आकार घेत फुल येते,मग एकच मोठे पान याच कणसात बी तयार होऊन सृष्टी चक्र पूर्ण होते.

कवला / मिकी माउस 


पावसाळ्यात संपूर्ण सह्याद्रीच्या पठारांवर पिवळी धम्मक फुले फुलतात. पिवळ्या पाकळ्यांच्या खाली लांबट ठिपके असतात ,हि अतिशय सुंदर फुले मिकी माउस सारखी दिसतात. स्मिथिया कुळातील हि वनस्पती मराठी मध्ये कवला या नावाने ओळखतात.

कंदीलपुष्प / मोरखरचुडी


वनस्पतींना वंश टिकवण्यासाठी पशु ,पक्षी,हवा,कीटक यांची मदत होते.रंगबिरंगी रंग,सुगंध,दुर्गंध, आकर्षित करण्यासाठीच, त्यांच्याच मदतीने परागीभवन होते,फलन व नंतर बीज प्रसार देखील होतो.सह्याद्रीच्या पठारावर व  जंगलात २० प्रकारची कंदील पुष्पे आढळतात.

सीतेची आसव - (पंरप्युरासेन्स ) -

युट्रीक्यूलेरीया या जातीतील हीं वनस्पती मांसाहारी आहे.अतिसूक्ष्म कीटकांना फसवतात आणि पचवतात.या वनस्पती मध्ये निळी पापणी (रेटीक्युलाटा), पानपापणी 
(स्टेल्यारीस ), चिरे पापणी ( स्ट्रायटयूला ), अशा विविध जातींची फुले सह्याद्री मध्ये सापडतात.    




गेन्द, चेडू  ( एरीओकोलोन )


श्रावण भाद्रपदात धरणी ओली चिब झालेली असते. सह्याद्रीच्या पठारांवर रंगांची उधळण चालू असते.या वेली कास,चाळकेवाडी,ठोसेघर,सडावाघापूर,कोयना या पठारांवर ५-१० सेमी.देठांवर छोटे छोटे चेंडू वारा आला की डोलायला लागतात. याला गेन्द असे म्हणतात, एरीओकोलोन या कुटुंबातील ही वनस्पती आहे.



गौरीहार / रानहळद / चवर ( करक्युमा स्युडोमोनटाना ) 



गणपती पासून नवरात्र, दिवाळी पर्यंत  सह्याद्रीच्या पठारांवर व डोंगर रांगामध्ये झाडीत कर्दळीसारखी पाने त्यातून फुट दिडफुट देठावर पांढरा,पिवळा,लाल रंगाची गोरीहाराची फुले दिसतात. हळद आले कुटुंबातील या वनस्पतीला स्थानिक लोक चवर असेही म्हणतात.

आमरी / हबेनारीया ( आर्किड )



सह्याद्रीच्या पठारांवर पावसाळ्यात रंगबिरंगी फुले फुलतात याच वेळी पांढरया रंगाची फुले लक्ष वेधून घेतात. या फुलांच्या आकारा व रचणे वरून त्यांची छान छान नावें पडली आहेत. * शेपूट आमरी *हिरवी आमरी      *पाचगणी आमरी *आभाळ आमरी *कंगवा आमरी *पिवळी आमरी * चिरे आमरी * बाहुली आमरी *आकाश आमरी* लाल चपटी आमरी

भारंगी ( क्लेरोडेनड्रम सीराटंम )



पावसाळ्यात भटकताना डोंरावर,रस्त्याच्या कडेला, झुडुपावर फुलपाखरासारख्या चार आकाशी पाकळ्या एक जांभळ्या रंगाची व फुलामध्ये चमकणारे निळे पुकेसर स्त्रीकेसर  ही फुले दिसतात. व्हर्बेनेसि कुळातील ही वनस्पती डोंगर भागामध्ये कोवळ्या पानाची भाजी करून खातात.


 मंजिरी 

पावसाळ्यात सह्याद्रीच्या पठारांवर पाणथळ जागेत बोटभर उंचीची जांभळ्या रंगाची तुळशीच्या मंजिर्या सारखी वनस्पती सर्वत्र दिसते.सातारा जवळ कास,चाळकेवाडी,सडा वाघापूर, कोयनेच्या परिसरात सहज पाहायला मिळते.पोगोस्टीमॉन डेक्कनेन्सीस हे शास्त्रीय नाव आहे.
 
वायुतुरा - आपोनोजेटान सातारेन्सिस -

सतारकरांच्या जिरेटोपातला मनाचा तुरा, जागतिक वारसा यादीमध्ये कास पाठरचा समावेश व्हावा या साठी ही वनस्पती अतिशय महत्वाची आहे. १५/२० सेमी. उंचीच्या देठावर दोन फाटे फुटतात त्यावर छोटी छोटी गुलाबी फुले येतात, ही वनस्पती फक्त कास पठारावर दिसते.  

कळलावी / अग्निशिखा (ग्लोरी लिली ) -

सह्यादीच्या डोंगर रांगेत पावसाळ्यात एक वनस्पती आपले लक्ष्य वेधून घेते.लाल भडक रंगाचे ज्वाले सारखी पाकळी,  फुलाच्या बाहेर असलेली  पिवळी धम्मक पुकेषर व स्त्री केशर यांची रचना ३ ते ५ फुट झुडपावर ही फुले फुलतात.

गुलाबी तेरडा ( पिंक बाल्सम )


पावसाळ्यात सह्याद्रीच्या पठारांवर काही ठिकाणे गुलाबी रंगानी सजलेली असतात.१ ते 1.५ फुट उंचीच्या वनस्पतीला गोलाकार कातरलेली कडांची पाने असतात,खोडाला गुलाबी रंगाची अत्यंत देखणी फुले येतात.ही वनस्पती समूहाने उगवते. पावसाला सरला की यांच्या बिया निसर्ग मध्ये उधळल्या जातात.

दवबिंदू ड्रोंसेरा इंडिका


निसर्गातील काही गोष्टी पाहण्यासाठी शोधक नजर व संयम असेल तर आपणाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.परागीभवन व बीज प्रसारासाठी वनस्पती ना कीटकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगाची फुले असतात,मात्र काही वनस्पतींना पोटासाठी किटकांवर अवलंबून रहावे लागते. दवबिंदू ही वनस्पती कीटकभक्षी, मांसाहारी आहेत.बोटभर उंचीच्या वनस्पतीवर लांब काड्यासारखी पाने,कडावर काटेरी केस त्यावर चिकट थेंब चमकत असतात, दोन तीन गुलाबी जांभळ्या रंगाची फुले असतात.कीटक उडत येतात, बसतात व फसतात. या वनस्पतीच्या दोन जाती कास,सडावाघापूर, चाळकेवाडी या परिसरामध्ये सापडतात. ड्रोंसेरा इंडिका सप्टेंबर ,आक्टोंबर मध्ये तर बर्मानी डिसेंबर मध्ये दिसतात.  


-------------
लेखन - राजकुमार पवार


फोटो-  
विजयकुमार हरिश्चंद्रे 
राजकुमार पवार 
गणेश टाक  


संदर्भ ग्रंथ
*फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्रीकांत इहंगळीकर, 
*पुष्पपठार कास - डॉ. संदीप श्रोत्री  
*सकाळ बालमित्र - डॉ. मंदार दातार